स्पर्धा परीक्षेतील यशात स्नेहालयाची भूमिका महत्त्वाची..” : ओंकार खुंटाळे

*”स्पर्धा परीक्षेतील यशात स्नेहालयाची भूमिका महत्त्वाची..”*

*ओंकार खुंटाळे*

 

अहिल्यानगर दिनांक 27 एप्रिल 2025 : स्पर्धा परीक्षेतील अंतिम मुलाखतीत उमेदवाराची सामाजिक प्रश्नांची जाणीव, सामाजिक कामाची अनुभूती आणि प्रगल्भता परीक्षक अन्य मुद्द्यांप्रमाणेच जोखतात. स्नेहालय संस्थेच्या सहवासात सामाजिक दृष्टी विकसित झाल्याने स्वतःला सहजतेने सिद्ध करता आल्याचे प्रतिपादन

ओंकार खुंटाळे यांनी केले.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात निंबळक (तालुका जिल्हा अहिल्यानगर) येथील ओंकार याचा 673 वा क्रमांक आला. स्नेहालय संचलित युवा निर्माण प्रकल्पातर्फे त्याचा आज स्नेहालय संस्थेत गौरव करण्यात आला.

स्नेहालय संस्थेच्या युवा शिबिरात आणि अन्य उपक्रमात वर्ष 2015 – 16 पासून ओंकार सक्रिय होता.

ओंकार म्हणाला की,

” गेली सहा वर्षे अविरत ध्यास घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. अभ्यासातील सातत्य, वेळेचे व्यवस्थापन आणि आत्मविश्वास ही शिदोरी सोबत असली तरी यश मिळाल्याशिवाय प्रयत्न थांबवायचेच नाहीत, हा निर्धार यशाला कारण ठरला. स्पर्धा परीक्षा देण्यामागील नैतिक उद्देश प्रयत्नांना बळ देतो, असे नमूद करून ओंकार म्हणाला की, सरकारी सोयी सुविधांचे, अधिकार आणि प्रतिष्ठेचे आकर्षण आपल्याला कधीच वाटले नाही .तर देशप्रेम आणि सामाजिक जाणीव व्यापक स्वरूपात व्यक्त करण्याची संधी म्हणून आपण सनदी सेवांकडे पाहिले.

यावेळी स्नेहालयचे कार्यकर्ते डॉ. मार्शिया वॉरन, डॉ. तेजस्विनी सोनवणे, डॉ. गिरीश कुलकर्णी, अनिल गावडे, हनिफ शेख, युवा निर्माण प्रकल्पाचे माजी संचालक नितीन वावरे आणि विद्यमान समन्वयक विकास सुतार, सहसंचालक अजित जगताप, ओंकारचे युवा निर्माण मधील मित्र मैत्रिणी, स्पर्धा परीक्षा देणारे नगर मधील काही विद्यार्थी उपस्थित होते.

आपला विश्वासू

 

विकास सुतार

समन्वयक : युवानिर्माण

9011026472

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *