महानगरपालिकेच्या मालकीच्या जागेत, रस्त्यावर बोअरवेल घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर गुन्हा दाखल 

 

 

 

 

 

 

 

 

महानगरपालिकेच्या मालकीच्या जागेत, रस्त्यावर बोअरवेल घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 

विनापरवाना रस्ता खोदल्यास कठोर कारवाई करून नुकसानीची भरपाई करून घेणार

 

आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांचा इशारा

 

अहिल्यानगर – महानगरपालिकेच्या मालकीच्या रस्त्यावर विनापरवाना बोअरवेल घेण्यासाठी रस्त्याची खोदाई करून विद्रुपीकरण करणाऱ्या नागरिकावर महानगरपालिकेने कठोर भूमिका घेत कारवाई केली आहे. प्रभाग अधिकारी राकेश कोतकर यांनी सदरचे विनापरवाना काम थांबवून कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियम कलम ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.

 

शहरातील चाँद सुलताना हायस्कुल शेजारी, चर्च समोरील, कलर्स इमारतीचे बाहेर रोडच्या कडेला महानगरपालिकेच्या जागेवर इम्रान शहाबुद्दीन शेख (रा. नांगरे गल्ली, ता. जि. अहिल्यानगर) हे विनापरवाना सरकारी जागेवर बोअरवेल घेत असल्याची माहिती महानगरपालिकेला मिळाली. त्यानुसार प्रभाग अधिकारी राकेश कोतकर व अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख आदित्य बल्लाळ यांनी ६ मार्च रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास जाऊन पाहणी केली. यावेळी इम्रान शहाबुद्दीन शेख हे कुठलीही परवाना घेता, विना परवाना महानगर पालिकेच्या जागेवर बोअरवेल घेत असल्याचे निदर्शनास आले. इम्रान शेख यांना तत्काळ काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता, सरकारी जागेवर बेकायदेशीरपणे बोअरवेल घेत असल्याचे समोर आले. त्यानंतर काम थांबवून बोअरवेल मधील पाईप काढून घेण्यात आले. त्यांच्याविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

शहरात अनेक ठिकाणी काही नागरिक रस्त्याचे खोदकाम परवानगी न घेता करतात. नव्याने केलेले रस्ते फोडले जातात. यामुळे महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने विनापरवाना रस्ते फोडणाऱ्या, खोदकाम करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. महानगरपालिकेच्या परवानगी शिवाय मनगरपालिकेच्या रस्ता अथवा इतर मालमत्तेची तोडफोड केल्यास, खोदकाम केल्यास रीतसर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *