तालुका भूमिअभिलेख कार्यालयात काम करणाऱ्या खाजगी इसमाची शेतकऱ्यास जीवे मारण्याची धमकी..
नगर प्रतिनिधी:-अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर तालुका भूमिअभिलेख कार्यालयातील अनागोंदी कारभार शिवसेना पक्षाच्या कार्यकर्ते व नेत्यांनी चव्हाट्यावर आणल्यानंतर एक गंभीर प्रकार समोर आला आहे.या कार्यालयात काम करणाऱ्या एका खाजगी इसमाने एका शेतकऱ्याला शिवीगाळ, मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना दि.७ जुलै रोजी सायंकाळी नगर तालुक्यातील अरणगाव येथे घडली आहे.याबाबत शेतकरी कचरू कोंडीबा दळवी (रा. अरणगाव,ता.नगर) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी भागीनाथ रघुनाथ शेळके (रा.शेळके मळा, अरणगाव) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.सदरील आरोपी शेळके हा भूमिअभिलेख कार्यालयात अशासकीय कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. फिर्यादी दळवी यांनी त्याच्याकडे जमिनीच्या मोजणी साठी ३-४ वर्षांपूर्वी पैसे दिले होते. मात्र त्याने ते शासकीय खात्यात भरले नाही, नेहमी उडवाउडवीची उत्तरे दिली.त्यामुळे दळवी यांनी पुन्हा भूमिअभिलेख कार्यालयात पैसे भरून जमिनीची मोजणी करून घेतली होती.त्यावेळी शेळके याची भूमिअभिलेख कार्यालयात त्यांनी तक्रार केली होती. तेव्हापासून ते त्यास वारंवार पैसे मागत होते. ७ जुलै रोजी दुपारी ४.१५ च्या सुमारास त्यांची गावात भेट झाल्यावर दळवी यांनी त्यास पुन्हा पैसे मागितले असता तू माझी तक्रार का केली? आता पैसे कशाचे मागतो असे म्हणत शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे दळवी यांनी फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादीवरून शेळके याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
