*यशस्वी जीवनासाठी तडजोड आवश्यक*
*न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा, राष्ट्रीय लोकदालतीचे उद्घाटन*
अहमदनगर दि.२७ जुलै :- जीवन एक तडजोड आहे. प्रत्येकाने आयुष्यात तडजोड केली पाहिजे. जास्तीत जास्त प्रकरणे आप आपसात तडजोड करून मिटविले पाहिजे. लोक अदालतमध्ये ग्रामपंचायत जिल्हा परिषद, महसूल आणि वीज वितरण, बँका पतसंस्था, इन्शुरन्स कंपनी सहभागी होत असतात म्हणून हा एक महायज्ञ असून त्यामध्ये प्रत्येकाने आपआपले योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर बार असोसिएशन आणि सेंट्रल बार असोसिएशनतर्फे शनिवारी (दि. 27) रोजी आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, बार असोसिएशनचे अध्यक्ष नरेश गुगळे, पोलिस उपअधिक्षक हरीष खेडकर, अॅड. भूषण बर्हाटे, अॅड. विक्रम वाडेकर, अॅड. सागर पादीर, अॅड. राजाभाऊ शिर्के, अॅड. पिंटू पाटोळे, अॅड. अंधारे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव भाग्यश्री पाटील आदी उपस्थित होते.
अॅड. नरेश गुगळे म्हणाले, जी प्रकरणे समोपचाराने मिटवण्यासारखे आहेत, ती प्रकरणे लोक अदालतमध्ये मिटवावीत. सामान्य लोकांनी वेळ व दिवस वाया न घालवता ही प्रकरणे जास्तीत जास्त मिटवून त्याचा फायदा घ्यावा, असे आवाहन केले.
प्रास्ताविक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव भाग्यश्री काशिराम पाटील यांनी केले. सूत्रसंचालन अॅड. वृषाली तांदळे यांनी तर, अॅड. सुनील मुंदडा यांनी आभार मानले.
*******