अहिल्यानगर शहरात ‘घर घर संविधान’ अभियान राबविणार;संविधानास ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महानगरपालिकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून संविधान उद्देश पत्रिकेचे वाचन
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-भारतीय संविधानास ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शासनाच्या आदेशानुसार पुढील वर्षभर घर घर संविधान अभियान राबविण्यात येणार आहे. आज अहिल्यानगर महानगरपालिकेत हर घर संविधान अभियानाच्या माध्यमातून संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामूहिक वाचन केले.तसेच येत्या वर्षभरात महानगरपालिके मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे नियोजन यावेळी करण्यात आल्याची माहिती मनपाच्या वतीने देण्यात दिली.दि.२६ नोव्हेंबर १९४९ रोजी आपण संविधान स्वीकृत केले.दि.२६ जानेवारी १९५० पासून संविधानाची अंमलबजावणी सुरु झाली.संविधानाचे महत्व अनेक स्तरांवर असुन भारतीय संविधानात समाजवादी,धर्मनिरपेक्ष, लोकशाही,गणराज्य घडविण्याचा व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार,अभिव्यक्ति, विश्वास,श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य,तसेच दर्जा व संधीची समानता प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता,बंधुता या मूल्यांचा विचार केलेला आहे. सन २०२४-२५ या अमृतमहोत्सवी वर्षात संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ “घर घर संविधान” साजरा करण्यात येणार आहे.संविधानाचे महत्व, त्यातील मूल्ये आणि त्याची अंमलबजावणी याबाबत शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये तसेच भावी नागरिकांमध्ये जागरूकता वाढवणे. संविधानातील मूलभूत हक्क,कर्तव्ये,आणि विविध तरतुदींचे शिक्षण देणे,ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक न्यायाची भावना रुजवणे. भारतीय संविधानातील समाजवादी,धर्मनिरपेक्ष, लोकशाही मूल्यांचा प्रचार व प्रसार करणे, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विविधतेतून एकता आणि समता या संकल्पनांचा विकास होईल.विद्यार्थ्यांना संविधानाच्या अध्ययनामुळे आणि चर्चेद्वारे त्यांच्या सामाजिक,आर्थिक आणि राजकीय अधिकारांची जाणीव करून देणे आणि त्यांच्या जबाबदा-यांचे पालन करण्यासाठी प्रेरित करणे.व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता,बंधुता या मूल्यांचा प्रचार व प्रसार करणे,ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना बळकट होईल.या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे.या अभियानांतर्गत येत्या वर्षभरात अहिल्यानगर महानगरपालिका मार्फत शाळा,महाविद्यालय, वसतिगृहे यांच्या दर्शनी भागात संविधानाची उद्देशिका लावणे,शालेय परिपाठात तसेच वसतिगृह प्रार्थनेत दररोज संविधान प्रास्ताविका,उद्देशिकचे वाचन विद्यार्थ्यांकडून करवून घेणे,शालेय वाचनालयात संविधानाच्या किमान पाच प्रती विद्यार्थ्यांना वाचनासाठी उपलब्ध करवून देणे,भारतीय संविधान बाबत सर्वसाधारण माहिती देणे,विद्यार्थ्यांना भारतीय संविधानातील प्रमुख प्रकरणे,हक्क,आणि कर्तव्ये यांवर मार्गदर्शन करणे,कार्यशाळांद्वारे विद्यार्थ्यांना संविधानाचे तत्त्वज्ञान आणि मूल्ये समजावून सांगणे, संविधान मुल्ये यावर पथनाट्य तयार करणे, शाळा,महाविद्यालयात संविधानाच्या विविध मुद्यांवर फलक,पोस्टर, आणि प्रदर्शन आयोजित करणे,संविधान दिन कार्यक्रम,संविधानावर आधारित निबंध लेखन, भाषण,वादविवाद, चित्रकला स्पर्धा इत्यादी उपक्रमांचे आयोजन, प्रजासत्ताक दिनी संविधानातील मुल्यांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन व सादरीकरण करण्यात येणार असल्याचेही मनपाच्या वतीने कळविण्यात आले या वेळी श्री.प्रशांत खांडकेकर,श्री.विजयकुमार मुंडे उपायुक्त, सौ.प्रियांका शिंदे उपायुक्त,श्री.मेहेर लहारे सहाय्यक आयुक्त,श्री. अशोक साबळे, सहाय्यक आयुक्त.श्री. फराटे,सहाय्यक आयुक्त,अनंत लोखंडे, कर्मचारी प्रतिनिधी व सर्व अहिल्यानगर महानगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.